ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : महिन्याला दहा हजाराचा हप्ता दिला नाही, म्हणून एका व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. इतकंच नव्हे, तर व्यापाऱ्याच्या घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्सच्या भरलेल्या बॉटल्सनी हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
धीरज वलेचा असं या व्यापाऱ्याचं नाव असून उल्हासनगरच्या कॅम्प ४ मध्ये त्यांचं किराणा दुकान आहे. याच परिसरात नवीन केशवानी हा गावगुंड सुद्धा राहतो. ‘तू धंद्यात खूप पैसे कमावतो, मला दर महिना १० हजार हप्ता द्यायचा’, असा दम या गुंडाने धीरज वलेचा यांना दिला होता. मात्र धीरजने हप्ता द्यायला नकार दिल्याने आरोपी नवीन केशवानी याला राग आला. यातूनच त्याने आपल्या इतर तीन साथीदारांसोबत धीरजच्या घरावर बियर आणि कोल्ड्रिंक्सच्या भरलेल्या बाटल्यांनी हल्ला चढवला.
या हल्ल्यात कुणालाही इजा झाली नाही. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. मात्र या घटनेनंतर धीरज वलेचा हे दहशतीखाली आहेत. या गुंडांना अटक करण्याची मागणी त्यांनी केलीय. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध घेतायत.






