डेहराडून (उत्तराखंड) : एकीकडे महिला खेळाडू खेळांमध्ये भारताचा झेंडा फडकावत असताना एका राष्ट्रीय स्तरावरील महिला बॉक्सरचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. उत्तराखंडच्या हल्द्वानी येथे एमबीपीजी कॉलेजमध्ये एमएच्या दुसऱ्या वर्षांत शिकणारी विद्यार्थीनी हेमलता उर्फ हेमा दानू हीचा रविवारी उशिरा संशयास्पद मृत्यू झाला.
ती उत्तराखंडच्या कपकोट येथील बडेत (कफलानी) या ठिकाणची रहिवाशी होती. सध्या शिक्षणासाछी ती हल्द्वानीमध्ये रहात होती. कृपाल सिंह यांची २० वर्षीय मुलगी हेमा कुमाऊं विश्वविद्यालयात शिकत होती. दरम्यान नुकतचं १० सप्टेंबर रोजी ती खटीमा येथे एका स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पराभूत झाली होती. त्यानंतर रविवारी प्रकृती बिघडलेल्या अवस्थेत ती सापडली असता तिला नैनीतालमधील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा रात्री दी़डच्या सुमारास मृत्यू झाला.
अद्याप मृत्यूचं नेमकं कारण कळालं नसलं तरी अशा अचानक मृत्यूमुळे हेमाच्या घरचे मात्र हादरले आहेत. त्यांनी पोलिसांशी बोलताना ती नुकत्याच झालेल्या खटीमा येथील एका सामन्यात पराभवानंतर फार तणावात होती. यावेळी ती पंचाच्या चूकीच्या निर्णयामुळे पराभूत झाल्याचंही तिने म्हटलं होतं. त्यामुळेच तिने तणावाखाली विष खाऊन आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.






