मुंबई (हितेश मिस्त्री) – कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमध्ये शाळा सुरू करणे जिकिरीचे असले, तरी विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातील सर्व शाळा सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. शिक्षण विभागाच्या या धाडसी पावलामुळे शैक्षणिक वर्ष ‘ड्रॉप’ होण्याबाबतची पालकांच्या मनातील चिंता अखेर दूर झाली आहे.
सप्टेंबरमध्ये शाळा सुरू करण्याबाबतची चाचपणीही झाली आहे. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जातील.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात 15 जूनपासून शाळा प्रत्यक्षात सुरू होऊ शकल्या नाहीत. सध्या सर्व ठिकाणी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. ऑनलाईन शिक्षणात ग्रामीण भागामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. सर्व विद्यार्थ्यांना ई-शैक्षणिक साधने खरेदी करणे शक्य नाही. इतकेच नाही, तर ई-शिक्षणाला विद्यार्थ्यांची मनापासून तयारी नाही. हातात पेन, पेन्सिल असली तरी शाळा भरल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत नाही. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागांमध्ये थेट शाळा सुरू करण्यात येणार असल्याचेही प्रा. गायकवाड यांनी स्पष्ट केले.







