७० लाखांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीला घाटकोपरमध्ये गुन्हे शाखा युनिट ७ ने केले गजाआड

मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : बंगळुरू महामार्गावरून एमआय या नामांकित कंपनीचे मोबाईल घेऊन जाणाऱ्य़ा ट्रकवर दरोडा टाकून एका टोळीने जवळपास ७० लाखाचे सीलबंद मोबाईल चोरले होते. त्या टोळीतील दोघांना मुंबई गुन्हे शाखेच्या युनिट-७ ने गजाआड केले. त्या दोघांकडून ४९५ सिलबंद मोबाईल हस्तगत करण्यात आलेत.

एक इसम छोटय़ा टेम्पोतून घाटकोपर पश्चिमेकडील गारोडिया नगर येथे चोरीचे मोबाईल विकण्यासाठी येणार असल्याची खबर युनिट-७ चे प्रभारी निरीक्षक मनीष श्रीधनकर यांना मिळाली. त्यानुसार श्रीधनकर यांच्या मार्गदर्शनानुसार निरीक्षक सुधीर जाधव तसेच स्वप्नील काळे व पथकाने गारोडिया नगर वेल्फेअर ऑफ हौसिंग सोसायटी परिसरात सापळा रचला.

मिळालेल्या माहितीनुसार सदर टेम्पो तेथे येताच पोलिसांनी टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले. टेम्पोची तपासणी केली असता त्यात एम.आय.मोबाईल कंपनीचे २५ बॉक्स मिळून आले. त्या बॉक्सेसमध्ये रेड मी ९ पॉवर या कंपनीचे ६९ लाख २९ हजार किंमतीचे ४९५ सिलबंद मोबाईल आढळून आले. हे मोबाईल घेऊन येणाऱ्य़ांकडे बिलांची विचारणा केली असता हे मोबाईल कर्नाटकात दरोडा टाकून चोरल्याचे सांगण्यात आले. रितेश कासेरा आणि विजय शेट्टी अशी त्या दोघांची नावे असून पोलिसांनी त्यांना अटक करून चोरीचे मोबाईल हस्तगत केले आहेत. याप्रकरणी मुलबागल ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here