मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुताम्यांना अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री औरंगाबादमध्ये

औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : आज (दि.१७) मुख्यमंत्री उध्दव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात येणार आहे. उद्धव ठाकरे सकाळी ७.३० वाजता मुंबईहून विमानाने औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. सकाळी ८.२५ वाजता त्यांचे चिकलठाणा विमानतळ आगमन झालंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरण्याची शक्यता आहे. कारण, मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्याला विरोधाचं गालबोट आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याला एमआयएम, मराठा समाज, धनगर समाजासह मनसेनंही विरोध केलाय.

मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री सकाळी १०.४० वाजता शेंद्रा येथील ऑरिक सिटी आणि डीएमआयसी अंतर्गतच्या विविध कामांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११.३० वाजता ते चिकलठाणा विमानतळ येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत.

बाबा चौक परिसरात शेकडो एमआयएम कार्यकर्ते एकत्र आले आहेत. हातात स्वागताचे फलक घेऊन कार्यकर्ते रस्त्यावर जमा झाले आहेत. बाबा चौकात स्वागतासाठी चारही बाजूने कार्यकर्ते उभे आहेत. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचाही तगडा बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. औरंगाबाद विमानतळाबाहेरून एमआयएमच्या आंदोलनकर्त्या दोन नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उद्धव ठाकरे यांच्या एमआयएमकडून होणाऱ्या उपहासात्मक पद्धतीच्या स्वागतास पोलिसांनी मनाई केली आहे.

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त औरंगाबादेत मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. शहरातील विमानतळ, बाबा पेट्रोलपंप, सिद्धार्थ उद्यान, जिल्हा परिषदेची प्रशासकीय इमारत आदी सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला आहे. या दिवशी विविध राजकीय पक्षही आक्रमक होण्याची शक्यता असल्याने पोलीस दलानेही काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुरेशी खबरदारी घेतलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here