अजिंठा (विशेष प्रतिनिधी सिध्दांत सोनवणे) : जिथे जाऊ तिथे सेल्फी काढण्याचा मोह अनेक तरुण तरुणींना आवरत नाही. मात्र बऱ्याच वेळा हा मोह जिवावर बेतल्याचेही दिसते. असाच सेल्फीचा मोह एका तरुणाच्या जीवावर बेतला.
औरंगाबाद जिल्ह्यामधील अजिंठा लेणी परिसरात सेल्फी काढताना जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील सप्तकुंडा पैकी असलेल्या एका कुंडामध्ये एक महाविद्यालयीन तरुण पडला. वेळीच ही बाब उपस्थितांच्या लक्षात आल्याने, त्याला दोरीच्या साह्याने स्थानिकांनी बाहेर काढले. सुदैवाने या तरुणाला काहीही न झाल्याने उपस्थितांनी सुटकेचा निश्वास सोडला.
अजिंठा लेणीमध्ये सात कुंड आहेत, त्यातील पहिल्या कुंडात तरुण पडला होता. जळगाव शहरातील एका महाविद्यालयात शिकणारे विद्यार्थी अजिंठा लेणीच्या परिसरात पर्यटनासाठी आले होते त्यावेळी ही घटना घडली. सप्त कुंडाच्या सुरुवातीला सेल्फी काढत असताना एकाचा तोल गेला आणि खोलवर असलेल्या गोलाकार कुंडामध्ये तो पडला होता. स्थानिकांच्या सतर्कतेने या तरुणाचे प्राण वाचले आहेत. अशा प्रकारे आपल्या जीवाला धोका निर्माण होईल असं कुठलंही कृत्य करु नका, असे आवाहन येथील पर्यटन विभागाच्या कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.






