पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते यांना बळजबरीने गुगल पेवरून लाच देणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्याने ट्रक सोडण्यासाठी हवेली तहसीलदार कोलते यांच्या वैयक्तिक बचत खात्यावर गुगल पेच्या माध्यमातून ५० हजार रुपये जमा करण्यात आले होते. त्यानंतर तृप्ती कोलते यांनी खडक पोलीस स्टेशन आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तहसीलदार तृप्ती कोलते यांना पुणे-सोलापूर महामार्गावरील शेवाळवाडी बस डेपोजवळ बेकायदा वाळूची वाहतूक करणारा ट्रक (एमएच १६ टी ४१००) दिसला. तृप्ती कोलते यांनी ट्रक चालकास ट्रक बाजूस घेण्यास सांगून थांबवला. त्यावेळी ट्रक चालक चावी घेऊन पळून गेला. यानंतर कोलते यांनी हडपसरचे मंडलाधिकारी व्यंकटेश चिरमुल्ला यांना फोन करुन याबाबत माहिती दिली. तसेच तलाठी किंवा कोतवाल यांना पाठवण्यास सांगितले. कोलते या ट्रकजवळ त्यांच्या गाडीत चालकासह तलाठ्याची वाट पाहत बसल्या होत्या. त्यावेळी दत्तात्रय पिंगळे हा त्यांच्याजवळ आला आणि त्याने आपण गाडीचा मालक असल्याचे सांगत गाडी सोडण्याची विनंती केली. तसेच त्यांना पैशांचे आमिष देऊ लागला. कोलते यांनी त्याला स्पष्ट नकार देऊन करवाई करणार असल्याचे सांगितले.
त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता अमित कांदे याने तृप्ती कोलते यांना फोन केला. परंतु, तृप्ती कोलते यांनी फोन उचलला नाही. त्यानंतर गुगल पे वरुन तृप्ती कोलते यांच्या खात्यात प्रथम १ रुपया आणि नंतर ५०००० रुपये जमा झाले. यानंतर तृप्ती कोलते यांनी आपल्याला ऑनलाईन लाच देण्याचा प्रयत्न झाल्याविरोधात तक्रार दाखल केली होती.
या तक्रारीची तात्काळ दखल घेत दत्तात्रय हिरामण पिंगळे ( वय ३३, रा.देऊळगावगाडा, ता. दौंड जिल्हा पुणे) आणि अमित नवनाथ कांदे (वय २९, कमलविहार गोपाळपट्टी मांजरी बुद्रूक, ता.हवेली जिल्हा पुणे) या दोघांवर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करण्यात आली आहे. सध्या खडक पोलीस या प्रकरणाला पुढील तपास करत आहेत.






