आकोट (तालुका प्रतिनिधी प्रताप शिंदे) : दारिद्रयरेषेखालील नागरिकांना शासनाच्या सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली मार्फत देण्यात येणारा तब्बल ६०० क्विंटल गहू अकोला जिल्ह्यातील खामगाव येथून हैदराबाद येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना अकोला पोलिसांनी जप्त केला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात सरकारी रेशनचा गहू पकडल्याने रेशन माफियांमध्ये खळबळ माजली आहे.
याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विशेष पथकाला गोपनीय माहिती मिळाली होती की, खामगाव येथून शासकीय रेशनचा गहू काळ्याबाजारात विक्रीसाठी जात आहे. या माहितीची तात्काळ दखल घेत पोलिसांनी कारवाई केली. जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे पोलीस निरीक्षक विलास पाटील आणि त्यांच्या चमूतील कर्मचाऱ्यांनी, बाळापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, राष्ट्रीय महामार्गावरील साई ढाबा येथे नाकाबंदी करून, खामगावच्या दिशेने येणाऱ्या एपी २० टीबी ४६९९ क्रमांक असलेल्या ट्रकला थांबवून झडती घेतली असता, सदर ट्रक मध्ये सरकारी रेशनच्या गव्हाची ६०० पोते आढळून आले. याबाबत ट्रक चालकाला विचारपूस केली असता, सुरवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतु पोलिसांनी त्याची कसून चौकशी केल्यावर, हा गहू शासकीय रेशनचा असून, तो गहू तेलंगणा राज्यात हैदराबाद येथे विक्रीसाठी जात असल्याचे त्याने सांगितले.
त्यावरून तेलंगणाच्या आदीलाबाद येथील २८ वर्षीय ट्रक चालक शेख जावेद ख्वाजा याला अटक करून, त्याच्याकडून ६ लाख रुपयांचा ३० टन गहू, २० लाख रुपये किंमतीचा ट्रक असा एकूण २६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ट्रक चालकाविरोधात बाळापूर पोलीस ठाण्यात, भारतीय जीवनावश्यक अधिनियम च्या कलम ३, ७ कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आणि काळ्या बाजारात विक्रीसाठी जाणाऱ्या या रेशनचा मालक कोण आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.






