मुंबई (प्रतिनिधी गणेश तळेकर) : अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही वैष्णवदेवीचे दर्शन घेत असतांनाच पती राज कुंद्राच्या अडचणीत मात्र वाढ होतांना दिसत आहे. पॉर्नोग्राफी केसमध्ये अडकलेल्या राज कुंद्राविरोधात आता ईडीने पीएमएलए केस दाखल केली आहे. ईडीला राज कुंद्राविरोधात मनी लाँडरिंगचे पुरावे सापडल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉर्नोग्राफिक कंटेटच्या विक्रीद्वारे मिळवलेला निधी लंडनमधील एका बँक खात्यात ट्रान्सफर करण्यात आल्याचा आरोप राज कुंद्रावर करण्यात आला आहे.
मुंबईच्या न्यायालयीन कोठडीत असलेला राज कुंद्राविरोधात मुंबई क्राइम ब्रँचने बुधवारी एक चार्जशीट दाखल केली आहे. तर या चार्जशीटमध्ये ४३ लोकांची साक्षही नोंदवण्यात आली आहे. त्यात अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि शर्लिन चोप्रा यांचाही यात समावेश आहे. दरम्यान तब्बल १५०० पानांची ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून, पोर्नोग्राफी प्रकरणात असलेला राज कुंद्रा आणि अन्य काही लोक यांच्याविरोधात ही चार्जशीट बनवण्यात आली आहे.
जवळपास दोन महिने राज कुंद्रा कोठडीत आहे. १९ जुलैला राजला अटक करण्यात आली होती. पोर्नोग्राफी प्रकरणात राजसह त्याच्या काही साथीदारांना अटक करण्यात आली होती.






