कोरोना टेस्ट करताना गळ्यात किट अडकून महिलेचा तडफडून मृत्यू

नवी दिल्ली : कोरोना तपासणी, कोरोनामुळे होणारी हॉस्पिटलची वाढीव बिले आणि कोरोना लसीकरणात झालेली फसवणूक तसेच कोरोना कालावधीत हॉस्पिटलचा निष्काळजीपणा गाजत असतांना, यात आता नवी भर पडली आहे. एका कोरोना तपासणी केंद्रावर मेडीकल स्टाफच्या निष्काळजीपणामुळे महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना टेस्ट करताना महिलेच्या गळ्यात किट अडकल्याने अर्ध्या तासात महिलेचा तडफडून मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान महिलेच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी कोरोना तपासणीदरम्यान महिलेचा मृत्यू झाल्याचा दावा फेटाळून लावला आहे. कोणत्यातरी आजारामुळे मृत्यू झाला असेल असं म्हटलं आहे. या घटनेने गावात एकच गोंधळ निर्माण झाला आहे. राम बहाद्दूर दास यांची (वय६५) वर्षीय पत्नी जासो देवी यांचा तपासणीदरम्यान मृत्यू झाला आहे.

राम बहाद्दूर दास यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची पत्नी कोरोना लस घेण्यासाठी गेली होती. मात्र लस घेण्याआधी तिला कोरोना तपासणीसाठी पाठवण्यात आलं. त्यावेळी जेव्हा त्यांच्या तोंडामध्ये तपासणीसाठी किट घालण्यात आलं ते गळ्यामध्येच अडकून राहीलं. जासो देवी यांना यामुळे श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला आणि त्या तिथेच बेशुद्ध पडल्या. यानंतर तातडीने डॉक्टरांना याबाबत माहिती देण्यात आली. डॉ. कमलेश कुमार यांनी कोरोना टेस्ट दरम्यान महिलेच्या गळ्यात किट अडकल्यामुळे मृत्यू झालेल्या गोष्टीला नकार दिला आहे. अशाप्रकारे घटनाच घडली नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाखांहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here