उस्मानाबाद (प्रतिनिधी) : येथे किडनी निकामी झालेल्या रुग्णाला किडनी देतो म्हणून एका डॉक्टराने फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. डॉक्टर असल्याचे सांगून तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. या बोगस डॉक्टराला बार्शी पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप सुतार असं या भामट्याचं नाव असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेरखेडा बावी येथील नितीन सुतार या तरुणांची गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या. नात्यातील प्रदीप सुतार याने मी पेशाने डॉक्टर असून तुला किडन्या सरकारी योजनेतून मिळवून देतो, असं सांगितलं.
यानंतर या भामट्याने पीडित तरुण व तरुणांच्या वडिलांकडून १ लाख ७० हजार रुपये देखील घेतले मात्र पैसे देऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रमोद हा किडनी देत नाही हे लक्षात आलं. त्यानंतर नितीन याने दिलेले पैसे मागण्यासाठी तगादा लावला असता ते पैसे ही परत देण्यास टाळाटाळ करत होता. अखेर हताश झालेल्या नितीनच्या वडिलांनी या प्रदीप सुतारचा शोध घेतला असता तो डॉक्टरच नसल्याचा प्रकार समोर आला.
एक नव्हे, दोन वर्षे नव्हे, तर हा प्रदीप सुतार नावाचा भामटा गेल्या १२ वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे समोर आले. त्यानंतर त्यांनी प्रदीप सुतारशी संपर्क करून पैसे मागितले असता ‘मी डॉक्टरच नाही मी तुला पैसेच देऊ शकत नाही तुला काय करायचे ते करून घे’ असा इशारा त्यांनी नितीन च्या वडिलांना दिला असता त्यांनी बार्शी पोलिसात तक्रार दिली. बोगस डॉक्टर प्रदीप सुतारला नुसती अटक होऊन चालणार नाही तर पोलिसांनी त्याच्याकडील असणारे पैसे परत मिळवून द्यावे अशी मागणी ते करत आहेत. दरम्यान, बोगस प्रदीप सुतार गेल्या १२ वर्षांपासून बार्शी कोल्हापूर सांगली या परिसरात डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होता. या काळात त्याने अनेक जणांना फसवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे.
या प्रकरणी बोगस डॉक्टर प्रदीप सुतारवर फसवणुकीसह अनेक गंभीर कलमासह गुन्हे दाखल करण्यात आले आहे. बार्शी पोलिसांनी त्याला अटक देखील केली आहे.






