रत्नागिरी (प्रतिनिधी) : जिल्ह्यातील पावस येथील एसटी स्टॅण्ड परिसरातून भरदिवसा तरुणाचे अपहरण करणाऱ्या पाचजणांना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. तरुणाला सुमो गाडीत जबरदस्तीने नेवून त्याचे अपहरण करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी की, विशाल रजपूत (वय – २१, रा. साखरीनाटे) याला पावस येथील एसटी स्टॅण्ड येथून पाचजणांनी दमदाटी आणि मारहाण करत सुमोत कोंबले आणि ती सुमो रत्नागिरीच्या दिशेने नेण्यात आली. ही घटना घडताच विशालचा भाऊ मनोज शिर्के याने पूर्णगड पोलिसांशी संपर्क साधून घडलेला प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी शोध घ्यायला सुरुवात केली.
अपहरणकर्त्यांना पोलिसांनी शिरगाव तिवंडेवाडी येथे पकडले. संतोष ठीक (वय – ४७, रा. शिरगाव), राजू राठोड (वय – ३८, रा. कोकणनगर), शाकील बोडकर (वय – ३४, रा. किर्तीनगर), विजय तावरे (वय – ६५, रा. शिरगाव), अब्दुल गनी अब्दुल सतार शेख (वय – ४६, रा. कोकणनगर) या पाचजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरिक्षक सुरेश गावित करत आहेत.






