मुंबई (संपादक सुनिल पाटील) : साहित्य क्षेत्रातील नामांकित व्यक्तिमत्व म्हणजे कवी अरुण म्हात्रे सर, सरांची एखादी कविता, गाणे ऐकले की मन त्या सुरावटीत हरवून जाते आणि मनात रेंगाळतात एका कवीचे शब्द आणि आठवणी. मग अशाच बहारदार कवितांचा नजराणा ‘जगणे व्हावे गाणे’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून डॉ. मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई यांनी रसिक प्रेक्षकांना दिला.
हा कार्यक्रम अतिशय खास होता, कारण कवयित्री शांताबाई शेळके, कविवर्य वसंत बापट व कवी वामन दादा कर्डक यांचे हे जन्मशताब्दी वर्ष. या कार्यक्रमाच्या निमित्ताने म्हात्रे सरांनी या कवींचा, त्यांच्या कवितांचा परिचय करून दिलाच पण त्याचबरोबर कविवर्य मंगेश पाडगावकर, कवी सुरेश भट,कवी ना. धो.महानोर तसेच काही नवकवी या सगळ्यांच्या कवितांचा आस्वाद रसिकांना श्रावणसरींच्या माध्यमातून दिला.
माणसाच्या मनाच्या अवस्थांचे प्रतिबिंब डोकावते ते कवितेतून, गाण्यातून. आणि मग आपण ज्या सुखाच्या शोधात आहोत ते सुख या कवितेतून प्रत्यक्ष भेटीला येते आणि येतो तो परमानंदाचा अनुभव! तसेच या कार्यक्रमाचे यथार्थ वर्णन करता येईल.सोहम अकादमीच्या संकल्पक असणाऱ्या डॉ. मीनल मॅडम नेहमीच रसिकांना वेगळा आनंद घेता यावा म्हणून प्रयत्नशील असतात आणि त्याचा परिपाक म्हणजे आजपर्यंतचे सोहम चे कार्यक्रम म्हणल्यास वावगे ठरणार नाही.
या अकादमीत येणारे वक्ते हे सोहमच्या परिवाराचे सदस्य केव्हा होतात हे कळतच नाही.अशा या सर्वांगसुंदर कार्यक्रमाचे सहजसुंदर सूत्रसंचालन श्रीमती प्रिया उपासनी यांनी केले . यांना श्रीमती रंजना वडेकर व श्रीमती समीक्षा तावडे यांची साथ लाभली ,तर तंत्रस्नेही गायत्री मेहेत्रे यांचे विशेष योगदान लाभले.
रसिकांच्या उस्फूर्त प्रतिक्रियांनी कार्यक्रमाची सांगता झाली आणि खऱ्या अर्थाने मन प्रफुल्लित करणारा ,उत्साह वाढवणारा असा हा कार्यक्रम संपन्न झाला.सोहम अकादमीच्या रसिकतेने भारावून जाऊन पुनश्च कार्यक्रम करण्याची इच्छा व्यक्त करून कविवर्य म्हात्रे सरांनी कार्यक्रमाची सांगता केली.






