लिव्ह इन रिलेशनमधून जन्मलेल्या १३ दिवसांच्या बाळाचा पित्यानेच केला खून

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : लिव्ह इन रिलेशन’मधून जन्मलेल्या तेरा दिवसांच्या बाळाचा पित्यानेच खून केल्याची घटना अडीच वर्षांनंतर समोर आली. आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने या नराधमाने बाळाला आईपासून तोडले आणि मित्राच्या साथीने हे क्रुरकृत्य केले. अनेकदा विचारूनही बाळाची माहिती प्रियकर देत नाही, हे लक्षात आल्यानंतर २५ वर्षीय तरुणीने मुंढवा पोलिसांकडे धाव घेतली होती.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी तरुणी व शुभम हे २०१७ पासून ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहत होते. १४ मार्च २०१९ मध्ये तरुणीने ससून रुग्णालयात मुलाला जन्म दिला. याबाबत तरुणीने शुभम याला घरी सांगण्यास सांगितले. त्यावेळी त्याने घरचे आपल्याला स्वीकारणार नाहीत, असे सांगितले. त्यामुळे बाळाला अनाथाश्रमात ठेवणार असल्याचे सांगितले. तरुणीने त्याला नकार दिला. पण, त्यावरही शुभम व त्याचा मित्र योगेशने २७ मार्च २०१९ रोजी बाळाला आश्रमात ठेवण्याच्या बहाण्याने नेले. काही वेळानंतर शुभम याने घरी येऊन बाळाला आश्रमात दिल्याचे सांगितले. त्यानंतर तरुणीने शुभमकडे बाळाबाबत अनेकदा विचारणा केली. मात्र, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर शुभम महेश भांडे (वय २३, रा. वडगाव शेरी) व त्याचा मित्र योगेश सुरेश काळे (वय २६, रा. मांजरी) यांना अटक केली होती. दोघेही सध्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, आरोपींनी बाळाचा खून करून मृतदेह विमानतळ परिसरातील वनक्षेत्राच्या झाडीत ठेवल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता, बाळाला गुंडाळून ठेवलेली चादर व त्याचे कपडे मिळून आले आहेत. तर, एका व्यक्‍तीनेदेखील हा प्रकार पाहिल्याची माहिती दिली आहे. पंचनामा करून पोलिसांनी कपडे व चादर जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here