रायगड जिल्ह्यातील सुधागड येथील शिक्षकाने शाळेतच घेतला गळफास

रायगड (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील ढोकळेवाडी शाळेतील एका शिक्षकाने शाळेतच गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण सुधागड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अमोल कांबळे (वय ३७) असं या शिक्षकाचं नाव आहे. अमोल कांबळे हे अनेक दिवस मानसिक तणावात होते. अचानक त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची पाली पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गावातील एक ग्रामस्थाने कांबळे यांच्या मोटारसायकलला चावी पाहून त्यांना शाळेत पाहण्यास गेले असता कांबळे गळफास लावलेल्या स्थितीत दिसले. ग्रामस्थांनी लगेच पोलिसांना ही घटना कळवली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अमोल कांबळे यांचा मृतदेह ताब्यात घेतला.

घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. अमोल कांबळे यांच्या पश्चात पत्नी, एक लहान मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. सायंकाळी उशिरा त्यांचा मृतदेह त्यांचे मूळ गावी वडजा तालुका वाशीम जिल्हा उस्मानाबाद येथे नेण्यात आला. तिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कांबळे यांच्यावर मानसिक आरोग्य संदर्भात उपचार सुरू होते, अशी माहिती त्यांच्या काही सहकाऱ्यांनी दिली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक विजय तायडे हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here