कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : प्रेमप्रकरणातून अल्पवयीन मुलीवर एअरगनमधून गोळी झाडल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी सकाळी कळंबा तलाव परिसरात घडला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने तरुणाला अटक केली आहे. दरम्यान, सकाळी घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली असताना, रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून अधिकृत माहिती मिळाली नव्हती. ऋषिकेश बाबूराव कोळी (वय 31, रा. मगदूम कॉलनी, पाचगाव, ता. करवीर) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.
करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये कळंबा तलाव परिसरात एका अल्पवयीन मुलीवर गोळी झाडल्याचा प्रकार घडला. गोळीच्या आवाजाने आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली असता, ऋषिकेश कोळी याने एअरगनमधून अल्पवयीन मुलीवर गोळी झाडल्याचा प्रकार समोर आला. ऋषिकेश पत्नीसह तलावाच्या ठिकाणी आला होता. यावेळी ती मुलगीही आईसह तेथे आली होती. या चौघांमध्ये वादावादी झाली. यावेळी पत्नीने तलावात उडी घेण्याची धमकी दिल्याने ऋषिकेशने अल्पवयीन मुलीच्या दिशेने एअरगनमधून गोळी झाडली. छर्रे लागल्याने ती मुलगी जखमी झाली.
याप्रकरणी ऋषिकेशला गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून पोलिसांनी कारसह एअरगन आणि छर्रे जप्त केले आहेत. त्याला करवीर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्याचे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.






