फोंडाघाट (प्रतिनिधी) : घाटमाथ्यावर जेसीबी चे अवघड पार्ट घेऊन जाणारा लेलँड ट्रक, बाजारपेठेतील ट्राफिक मध्ये साईड देताना, कमान पाटे तुटल्याने, लगतच्या गटारातील एम.एस.सी.बी. च्या लाईट पोलवर कलंडल्याने रस्त्यावर आडवा झाला. त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक खोळंबली होती.
याबाबत माहिती अशी की, सकाळी साडेअकराच्या दरम्यान एमएच ४६ बीएफ ७२८५ कोल्हापूरकडे जाणारा ट्रक ट्रॅफिक मध्ये, बाजारपेठेच्या मध्यावर आला असता त्याचे कमान पाटे तुटल्याने, ड्रायव्हरचा ताबा सुटला आणि ट्रक लाईटच्या पोलवर कलंडला. उपस्थित स्थानिक ड्रायव्हर, नागरिकांनी ट्रक मागेपुढे घेण्यास सांगून काढण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.
ट्रक रस्त्याच्या मध्येच अडकल्याने दुतर्फा ट्रक ,कंटेनर, टँकरची लांबच लांब रांग उभी राहिली. सुमारे दीड तास वाहतूक आणि लाईट खंडित झाली होती. घटनेची माहिती समजताच एम. एस. सी. बी. चे गोसावी आणि पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला प्रसंगावधान राखून तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गोसावींनी विद्युत प्रवाह त्वरित बंद केला तर पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला यांनी पवन ट्रान्सपोर्टचा जेसीबी मागवुन दोन मिनिटात ट्रक ओढून ढकलल्यानंतर वाहतूक पूर्ववत झाली. त्यामुळे फोंडाघाट बाजारपेठेतील पार्किंग, वाहतूक आणि वाहतुकीचा खोळंबा याचा प्रश्न ऐरणीवर आला असून याकडे प्रशासनाने सातत्यपूर्ण ठोस उपाययोजना करावी अशी आग्रही मागणी पादचारी, व्यापारी यांनी केली आहे.
त्यामुळे सुमारे दीड तास खंडित झालेली वाहतूक पूर्ववत सुरू झाल्यानंतर ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला. ट्रक जर पूर्णतः कलंडला असता तर, अनंतचतुर्थीच्या दिवशी बाजारपेठेत दुर्घटना घडली असती. कर्मचारी गोसावी व पोलीस कॉन्स्टेबल मुल्ला व कळंत्रे यांच्या तत्परतेमुळे वाहतूक कोंडी दीड तासाच्या अथक प्रयत्नानंतर सुटली.






