कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तीन बारवर कारवाई

navi-mumbai-mahanagarpalika

नवी मुंबई (प्रतिनिधी विरेंद्र म्हात्रे) : कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम सुरु केली आहे. रात्री दहानंतरही व्यवसाय सुरू ठेवणाऱ्या ३ बारवर कारवाई केली असून त्यांच्यावर प्रत्येकी ५० हजार रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. गणेशोत्सव काळात ४०४ जणांवर कारवाई केली असून २ लाख ७२ हजार ६०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

नवी मुंबईमध्ये हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु अनेक हॉटेल चालक रात्री उशिरापर्यंत व्यवसाय करत असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. यामुळे महानगरपालिकेच्या दक्षता पथकानेही कारवाई सुरू केली आहे. सेक्टर १९-डीमधील लिव्ह इट अप रेस्टॉरंट बारमध्ये रात्री ११ नंतरही ग्राहक असल्याचे निदर्शनास आले. कोपरखैरणे सेक्टर-९ मधील मयूर रेस्टॉरंट आणि बार आणि बेलापूर सेक्टर-११ मधील बिग बॉस या हॉटेलवर छापा टाकला असता उशिरापर्यंत हॉटेल सुरू असल्याचे निदर्शनास आले.

कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन झाले नाही तर रुग्ण संख्या पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करताना कोणी आढळले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे मनपा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here