जालना (प्रतिनिधी) : शहरातील गणपती विसर्जन सुरू असताना लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरातून गावठी पिस्तुल सोबत बाळगणाऱ्या एकवीस वर्षीय तरुणाला कदीम जालना पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी गावठी पिस्तुल जप्त केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, २१ वर्षीय तरुण पांढऱ्या रंगाचे कपडे घालून गणपती विसर्जन दरम्यान लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरात कमरेला गावठी पिस्तुल लावून फिरत असल्याची माहिती कदीम जालना पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून शहरातील लक्ष्मीपुरा जुना जालना परिसरातील गल्लीतून जाणाऱ्या या एकवीस वर्षीय तरुणाची झडती घेतली.
तपासणीदरम्यान त्याच्या कमरेला मागील बाजूस पॅण्टमध्ये एक गावठी पिस्तुल आढळले. पोलिसांनी पिस्तुल बाबत विचारपूस केली असता समाधानकारक उत्तर न मिळाल्याने अखिलेश बालाजी या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच याबाबत अधिक तपास सुरू आहे.







