मुंबई (प्रतिनिधी हितेश मिस्त्री) : येथील विमानतळावर कस्टम विभागाने एक मोठी कारवाई केली आहे. विमानतळावर तब्बल ४.९५ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. जोहान्सबर्ग येथून आलेल्या दोन महिलांकडून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अटक करण्यात आलेल्या या महिला आई-मुलगी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे. कतार एअरलाईन्समध्ये प्रवास करणारी आई-मुलगी या जोहान्सबर्ग येथून मुंबईला येत होत्या. फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचाराच्या नावाखाली या दोघीही भारतात आल्या होत्या असे रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे. एजन्सीच्या मते, या तस्करांनी ट्रॉली बॅगमध्ये हेरॉईन लपवून टेवले होते. अधिकाऱ्यांच्या मते, सहसा प्रवासी एकावेळी दोन किलोपेक्षा जास्त औषधे घेऊन प्रवास करत नाहीत.
कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे हेरॉईन भारतात आणण्यासाठी दोन्ही महिला प्रवाशांना प्रत्येकी ५ हजार डॉलर देण्याचं सांगण्यात आलं होतं. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ ऑक्टोबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणात भारतातील आणखी कोणी सहभागी आहे का? याचा तपास आता करण्यात येत आहे.






