ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : साकीनाका येथे महिलेची हत्या करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या मोहन चौहाणच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली आहे. त्याच्या पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मोहनला दुपारी विशेष सेशन कोर्टात हजर करण्यात आले होते. या वेळी पोलिसांच्या तपासात काही महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत.
10 सप्टेंबरला रात्री उशिरा साकीनाका येथील खैरानी रोड, रशीद कंपाऊंड, चांदिवली स्टुडिओसमोर त्याने या महिलेवर लैंगिक अत्याचार करून तिला अमानुष मारहाण केली होती. तिच्या गुप्तभागावर तीक्ष्ण हत्याराने दुखापत केली होती. त्यामुळे ती गंभीररीत्या जखमी झाली होती. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान तिचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला होता.
तिच्या मृत्यूनंतर पोलिसांनी हत्येचा कलम वाढविला होता. याच गुन्ह्या नंतर अॅट्रोसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हा दाखल होताच अवघ्या काही तासांत मोहन चौहाणला पोलिसांनी अटक केली होती. या घटनेनंतर तो उत्तर प्रदेशला पळून जाण्याच्या प्रयत्नात होता, मात्र त्याचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला.






