मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : शहर व उपनगरांत सोमवारी रात्री आलेल्या पावसाने काल मंगळवारी दिवसभर संततधार कायम ठेवली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून शहरात आणखी दोन दिवस मुसळधार पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तवत हवामान खात्याने मुंबईसाठी ‘यलो ऍलर्ट’ जारी केला आहे.
धरणक्षेत्रातही धो-धो पाऊस कोसळल्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया अनेक तलावांची पाणीपातळी ९९ टक्क्यांवर गेली आहे. मुंबईबरोबरच उर्वरित राज्यातही पावसाचा जोर वाढला आहे. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे.
मुंबई शहरासह पश्चिम आणि पूर्व उपनगरांत सोमवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला आहे. मंगळवारीही संपूर्ण दिवसभर पावसाची संततधार सुरू राहिल्यामुळे अंधेरी, कुर्ला, जोगेश्वरी, बोरिवली, भांडुप, घाटकोपर पसिरातील सखल भागांत पाणी साचले. या पाण्याचा वेळीच निचरा करण्यासाठी मुंबई महापालिका प्रशासन सक्रिय राहिल्यामुळे पावसाचा जनजीवनाला मोठा फटका बसला नाही. शहरातील रस्ते वाहतूक मात्र मंदावली होती.
हवामान खात्याने मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मागील २४ तासांत मुंबई शहर परिसरात १४,५४ मिमी, पूर्व उपनगरांत २०.६६ मिमी, पश्चिम उपनगरांत १७.६५ मिमी तसेच शेजारच्या ठाणे जिह्यात १९ मिमी आणि नवी मुंबईत ३७.१८ मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझ परिसरात ३७.२ मिमी पाऊस पडला.






