नवी दिल्ली : केंद्र सरकारने एअर मार्शल विवेक राम चौधरी यांची नवीन हवाईदल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. ते सध्या व्हाईस चीफ ऑफ एअर स्टाफ आहेत.
विद्यमान हवाईदल प्रमुख आर. के. एस. भदौरिया ३० सप्टेंबरला निवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी चौधरी हे १ ऑक्टोबरला हवाईदल प्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत.
चौधरी यांना जून महिन्यात एअर मार्शल हरजीत सिंह अरोडा यांच्या जागी हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आले होते. याआधी त्यांनी वेस्टर्न एअर कमांडचे कमांडर-इन-चीफ म्हणून काम केले आहे. ते राष्ट्रीय संरक्षण अकादमीचे विद्यार्थी असून २९ डिसेंबर १९८२ रोजी हवाई दलाच्या लढाऊ तुकडीमध्ये रुजू झाले होते.






