औरंगाबाद (जिल्हा प्रतिनिधी दत्तात्रय मोटे) : येथे बाप या नावाला कलंक लागला आहे. आपल्या पोटच्या मुलीला चक्क तीन वेळा या बापाने विकल असल्याचं समोर आलं आहे. पैशाच्या लोभासाठी बापाने आपल्या मुलीला विकल्याचं घृणास्पद कृत्य नुकतंच औरंगाबादेत समोर आलं आहे. यापेक्षा भयानक म्हणजे मुलगी गर्भवती देखील राहिली होती. मात्र, तिचा गर्भपात देखील करण्यात आला होता. मुलीच्या अशा स्थितीनंतरही तिचं जबरदस्तीनं लग्न लावून देण्याचा संतापजनक प्रकार घडवला आहे. सदर घटनेनंतर मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकारामुळे असा बाप कोणालाही मिळू नये, अशीच भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे. पोलिसांनी देखील वडील, सावत्र आई आणि काकाला जेरबंद करण्यात आलं असून त्यांना ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदर घटना औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी पोलिसांच्या हद्दीत घडली आहे.
दरम्यान, सदर मुलीला मुलीच्या कुटुंबातील सदस्यांनी त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने गुजरातला विकले असल्याची माहिती समोर आली आहे. गुजरातला एका महिलेला विकून त्या महिलेकडून त्यांनी २ लाख रुपये देखील घेतले होते. गुजरातला विकल्यावर सदर पीडीतेवर त्याठिकाणी दोघांनी तिच्यावर अत्याच्यार देखील केला. सतत होत असलेल्या अत्याच्याराने ती मुलगी आजारी देखील पडली. त्यामुळे, ज्या महिलेला मुलगी विकण्यात आली होती त्या महिलेने सदर पिडीतेला पुन्हा औरंगाबादला परत पाठवले. सदर घटनेत तिचे वडील, सावत्र आई आणि काका हे सहभागी होते.
सदर पिडीतला गुजरातमधून पाठवण्यात आल्यावर तिथे तिला अनेक हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या होत्या. मात्र, तरीदेखील तिच्या कुटुंबातील सदस्यांना तिची किव आली नाही आणि त्यांनी पुन्हा तिला दुसऱ्यांदा नंदुरबारमधील एका व्यक्तीला विकले. त्यानेही तिच्यावर दोन महिने अत्याचार केले. दरम्यान, यावेळी पीडिता गर्भवती राहिली. ती सतत आजारी पडत असल्याने त्या व्यक्तीनेही मुलीच्या आई-वडिलांशी संपर्क साधून त्यांना नंदूरबारला बोलावून घेतले. तेथे मुलीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले.
दरम्यान, पीडीतेच्या कुटुंबीयांनी तिला नंदूरबार येथून परत आणल्यावर ती गर्भवती असल्याचं लक्षात आलं आणि तिच्यावर वेगवेगळ्या औषध देण्यात आली आणि तिचा गर्भपात करण्यात आला. गर्भपात केल्यावर काही दिवसांनी पुन्हा तिला सातारा येथील व्यक्तीकडून पैसे घेऊन त्याच्यासोबत तिचे बळजबरीने लग्न लावून दिले. तेथेही पतीकडून तिला लैंगिक अत्याचार सहन करावे लागले असल्याचं उघड झाल आहे.
दरम्यान, पुन्हा तिचे नांदेडमधील हदगाव येथे लग्न लावून देण्यात आले. मात्र, तिला आता शेवटचा पर्याय उरला होता आणि तो म्हणजे आत्महत्येचा. पीडीतेने आपलं हे दुख सांगण्यासाठी तिच्या मावशीला फोन केला आणि म्हणाली मला येथून घेवून जा, ‘नाहीतर मी आत्महत्या करीन’. त्यानंतर मुलीने नांदेडमधील हदगाव पोलीस ठाण्यात पैशांसाठी तीन वेळा विक्री केल्याची ७ जणांविरुद्ध तक्रार दिली. ही घटना वाळूज एमआयडीसी हद्दीत घडल्याने हदगाव पोलिसांनी हा गुन्हा वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. पोलिसांनी वडील, सावत्र आई आणि काका यांना अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.






