नंदुरबार (संपादक सुनिल पाटील) : नुकतीच नंदुरबारच्या अधीक्षकपदी पी.आर.पाटील यांची बदली झाली. यावेळी त्यांचे डीवायएसपी शिरीष जाधव यांनी सत्कार करत स्वागत केले.
नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांची बदली नंदुरबारचे पोलीस अधीक्षकपदी झाली. शाहूवाडी तालुक्याच्या सरुड गावातील सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेले पी आर पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विक्रीकर निरीक्षक पासून आय पी एस पदापर्यंत केलेला प्रवास खूप प्रेरणादायी आहे.
१९९५ मध्ये विज्ञान शाखेची पदवी घेतल्यानंतर पाटील यांनी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून विविध टप्पे पार केले. १९९७ मध्ये विक्रीकर निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण झाले. १९९८ ला तहसीलदार पदी त्यांची नियुक्ती झाली. १९९९ मध्ये पोलीस उपाधीक्षक म्हणून पोलीस दलात रुजू झाले. त्यानंतर जळगाव येथे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक म्हणून त्यांनी काम पाहिले. पुढे पुणे येथे गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त म्हणून त्यांनी आपली कारकीर्द गाजवली होती.
गेल्या वर्षी त्यांची कोल्हापूर येथे नागरी संरक्षण हक्क विभागाचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर आता ते नंदुरबारचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहणार आहेत.






