जळगाव जिल्ह्यात राजकीय भूकंप; १२ नगरसेवकांनी बांधले शिवबंधन

मुंबई (उपसंपादक दिलीप दळवी) : जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायतीमधील नगराध्यक्षांसह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी व अपक्ष असे ११ नगरसेवक व मुक्ताईनगर नगरपंचायतीतील गटनेता यांनी शिवसेनेत शिवबंधन बांधून प्रवेश केल्याची माहिती मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा प्रवेशाचा कार्यक्रम झाला. भाजपासोबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.

बोदवड आणि मुक्ताईनगर या दोन्ही नगरपंचायतीत भाजपची सत्ता आहे. मात्र, आज शिवसेनेत प्रवेश करणारे दोन्हीकडील भाजप नगरसेवक येथील खडसे समर्थक आहेत. त्यामुळे हा शिवसेनेकडून जळगाव जिल्ह्यात भाजपासह राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी मुक्ताईनगरातील ६ नगरसेवकांना प्रवेश देऊन शिवसेनेने माजी मंत्री खडसेंना जबरदस्त झटका दिला होता.

बोदवड येथील नगराध्यक्षा मुमताजबी सईद बागवान, नगरसेवक देवेंद्र समाधान खेवलकर, आफरिन सय्यद असलम बागवान, सुशीलाबाई मधुकर खाटीक, अकबर बेग मिर्झा, सुशिलाबाई आनंदा पाटील, नितीन रमेश चव्हाण, सुनील कडू बोरसे, साकीनाबी शे. कलिम कुरेशी, आसमाबी शे. इरफान यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. दरम्यान, मुक्ताईनगर नगरपंचायतीत शिवसेनेने भाजप गटनेत्यांसह तब्बल ६ नगरसेवकांना शिवसेनेत प्रवेश दिला होता. हा प्रवेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच दिला होता. यानंतर शिवसेनेत प्रवेश केलेल्या गटनेत्याच्या जागेवर निलेश प्रभाकर शिरसाठ यांची निवड खडसेंनी केली होती. यानंतर काही दिवसांतच शिवसेनेने भाजपचा दुसरा गटनेताही गळाला लावला आहे. गटनेता निलेश प्रभाकर शिरसाठ यांनीही शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.

मातोश्रीवर मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या सर्व नगसेवकांच्या हातावर शिवबंधन बांधण्यात आले. या वेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील तसेच शिवसेना तालुका प्रमुख छोटू भोई, विधानसभा क्षेत्रप्रमुख सुनील पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here