नवी दिल्ली : दिल्लीच्या रोहिणी कोर्टातच शुक्रवार गँगवॉर सुरू झालं… आणि गोळ्यांच्या आवाजानं संपूर्ण न्यायालय परिसर हादरून गेला. न्यायालयात सुनावणीसाठी न्यायालयासमोर हजर झालेल्या कुख्यात गुंड जितेंद्र गोगी याच्यावर टिल्लू ताजपुरिया टोळीनं गोळीबार केला. या गोळीबारात गोगी जागीच ठार झाला. तर न्यायालयात हल्ला घडवून आणणाऱ्या या दोन हल्लेखोरांना पोलिसांनी टिपलं. या घटनेत दोन्ही बाजुंनी ४० हून अधिक गोळ्या झाडल्या गेल्या. दोन्ही हल्लेखोर वकिलाच्या पोशाखात न्यायालयात दाखल झाले होते.
गोगी आणि टिल्लू यांच्यातील जुन्या वैराच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला घडवून आणण्यात आला. परंतु, हेच गँगस्टर एकेकाळी एकमेकांचे पक्के मित्र होते. मात्र, मैत्री अशी तुटली की दोघंही एकमेकांचा जीव घेण्यासाठी आतूर झाले. याच गँगवॉरमध्ये आत्तापर्यंत दोन्ही टोळ्यांचे २५ हून अधिक गुंड ठार झाले आहेत.
टिल्लू ताजपुरीया गावचा रहिवासी आहे. तर जितेंद्र गोगी हा अलीपूर गावचा रहिवासी होता. दोघांची मैत्री तुटल्यानंतर दोघं वेगवेगळ्या मार्गानं निघून गेले. परंतु, यावेळी दोघांच्या वादाचं रुपांतर कट्टर शत्रुत्वात झालं होतं. या अगोदर २०१८ मध्येही दिल्लीच्या बुराडी भागात टिल्लू गँगकडून एक हल्ला घडवून आणण्यात आला होता. यात तीन जणांची हत्या झाली होती तर पाच जण जखमी झाले होते. या घटनेतही गोगी गँगचं नाव समोर आलं होतं.
या गँगवॉरमध्येच अनेक हत्या करण्यात आल्याचा खुलासा गेल्या महिन्यात झाला होता. १० ऑगस्ट रोजी सूरज आणि अक्षय नावाच्या टिल्लू गँगशी संबंधीत दोन गुंडांना अटक करण्यात आली होती. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ जुलै रोजी नितेश नावाच्या व्यक्तीचा त्यांनी खून केला होता. नितेशचा भाऊ हा गोगी गँगशी संबंधीत होता. २० फेब्रुवारी २०२० रोजी गोगी टोळीनं आणि नितेशच्या भावाननं टिल्लू गँगच्या पवन नावाच्या व्यक्तीला ठार केलं होतं. याच घटनेचा बदला म्हणून नितेशची हत्या करण्यात आली होती.






