आरोपीने पळ काढल्याप्रकरणी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलीस निलंबित

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीने वारजे पोलीस ठाण्यातून पळ काढला होता. घटनेला जबाबदार धरत पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातील तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

पोलीस हवालदार संभाजी रघुनाथ गायकवाड, पोलीस नाईक महेश गंगाराम धोत्रे, पोलीस शिपाई विशाल तानाजी कदम ( नेमणूक वारजे माळवाडी पोलिस ठाणे) अशी निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे असून, अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यातून शनिवारी (दि.१८) सकाळी सहा वाजता पळ काढला होता. शुक्रवारी पोलिसांनी त्याला अटक केली होती.

आरोपी फरार झाल्यामुळे खळबळ उडाली होती. त्यानंतर कोम्बिंग ऑपरेशन राबवून पोलिसांनी रविवारी त्याला कर्वेनगर परिसरातून दारु गुत्त्यावर ताब्यात घेतले. त्याने चार वर्षांच्या मुलीला पैशांचे आमिष दाखवत लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या आरड्याओरड्याने हा प्रकार इतरांच्या लक्षात आला. त्यानंतर वारजे पोलिसांनी तत्काळ आरोपीला अटक केली होती. त्यानंतर त्याला पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. गंभीर गुन्हयातील आरोपी पळून गेल्याने वारजे पोलिसांना टीका सहन करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here