नवी दिल्ली (वृत्तसंस्था) | स्वातंत्र्य दिन २०२६ च्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संरक्षण दल आणि केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या जवानांसाठी ७८ शौर्य पुरस्कारांची घोषणा केली आहे. यामध्ये मरणोत्तर प्रदान करण्यात येणाऱ्या १३ पुरस्कारांचा समावेश असून, देशासाठी विरंगुळा व पराक्रम गाजवणाऱ्या शूर जवानांचा गौरव करण्यात आला आहे.
राष्ट्रपतींनी जाहीर केलेल्या पुरस्कारांमध्ये तब्बल नऊ ‘कीर्ती चक्रां’चा समावेश असून, त्यातील सात पुरस्कार हे मरणोत्तर जाहीर करण्यात आले आहेत. कीर्ती चक्र प्राप्त करणाऱ्यांमध्ये लेफ्टनंट कर्नल मॅनिओ फ्रान्सिस पीएफ (२१ पॅरा), मेजर जितेंद्र राठी (२ पॅरा), हवालदार गजेंद्र सिंग (२ पॅरा – मरणोत्तर) यांच्यासह गृह मंत्रालयांतर्गत जगबीर सिंग, जसवंत सिंग, बलविंदर सिंग, तारिक हुसेन, बशीर अहमद आणि इन्स्पेक्टर सुनील कुमार (सर्वजण मरणोत्तर) यांचा समावेश आहे.
इतर प्रमुख पुरस्कारांची यादी
- शौर्य चक्र बार: १
- शौर्य चक्र: १९ (यापैकी १ मरणोत्तर)
- सेना मेडल (शौर्य) बार्स: ५
- सेना पदक (शौर्य): ३६ (यात ५ मरणोत्तर पदकांचा समावेश)
- नौसेना पदक (शौर्य): ३ (यात कमांडर युवराज कुमार, कमांडर विनीत शर्मा आणि कमांडर अविनाश अण्णासो यांचा समावेश)
- वायुसेना पदक (शौर्य): ५
याशिवाय नौदल श्रेणीत लेफ्टनंट कमांडर शिवम कुमार यांना ‘शौर्य चक्र’ जाहीर झाले आहे. तसेच ‘मेन्शन-इन-डिस्पॅचेस’ अंतर्गत कमांडर निखिल चुघ, लेफ्टनंट अजय जोस एन. जोसेफ, अभिषेक धनवडे आणि अश्विन संतोष यांना गौरवण्यात आले आहे.
या राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील अनेक कर्तबगार जवानांना व अधिकाऱ्यांना विविध शौर्य पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. यामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक रवींद्र जैन, पोलीस उपाधीक्षक सुभाष भुजंग आणि सहायक उपनिरीक्षक संजय वायचळे आदींचा विशेष समावेश असून यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या शूर अधिकाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







