जाकार्ता (वृत्तसंस्था) | इंडोनेशियातील फ्लोरेस बेटाच्या किनारपट्टीजवळ आज (शनिवार, १५ ऑगस्ट) सकाळी ७.७ तीव्रतेचा भूकंप झाला. देशाच्या हवामानशास्त्र, हवामान आणि भूभौतिकी संस्थेने (BMKG) या घटनेची पुष्टी केली आहे. या भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे संपूर्ण परिसरात मोठी घबराट पसरली असून, आतापर्यंत २० जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकांकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार (NCS), हा भूकंपाचा धक्का भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ३:४३ वाजता बसला.
‘शिन्हुआ’ वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, बीएमकेजीने दिलेल्या माहितीनुसार या भूकंपाचा केंद्रबिंदू पूर्व नुसा तेंगारा प्रांतातील ‘म्बे’ शहराच्या ईशान्येला ३६ किलोमीटर अंतरावर आणि अवघ्या १५ किलोमीटर खोलीवर होता. या तीव्र भूकंपानंतर प्रशासनाकडून तातडीने त्सुनामीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
पहिल्या महाभयंकर भूकंपानंतर त्याच भागात ५.६ आणि ५.९ तीव्रतेचे आणखी दोन जोरदार आफ्टरशॉक्स (मुख्य भूकंपानंतरचे धक्के) जाणवले. किनारपट्टीवरील अनेक भागांसाठी त्सुनामीचा धोका वर्तवण्यात आला असून, नागरिकांना तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या भूकंपाचे अनेक थरारक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. यामध्ये इमारती कोसळताना, त्यांचे मोठे नुकसान होत असताना आणि जीव वाचवण्यासाठी नागरिक घराबाहेर पडून सुरक्षित ठिकाणांकडे धावताना दिसत आहेत.
इंडोनेशियाच्या भूकंपाच्या विनाशकारी इतिहासात २००४ मधील सुमात्रा किनाऱ्यालगत झालेला ९.१ तीव्रतेचा भूकंप अत्यंत विनाशात्मक ठरला होता, ज्यामुळे निर्माण झालेल्या त्सुनामीमुळे सुमारे २ लाख २० हजार लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यापैकी एकट्या इंडोनेशियामध्ये १ लाख ७० हजार बळी गेले होते. तसेच २०१८ मध्ये लोम्बोक बेटावर झालेल्या शक्तिशाली भूकंपामुळे लोम्बोक आणि शेजारील सुंबावा या लोकप्रिय पर्यटन स्थळांवर ५५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला होता.







