– विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर सादरीकरणाने जिंकली मने; विविध उपक्रमांचे आयोजन
जळगाव (संपादक सुनिल पाटील) | रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल व रोझलँड प्राथमिक विद्या मंदिर, जळगाव येथे भारताचा ७९ वा स्वातंत्र्य दिन (८० वे वर्ष) अत्यंत उत्साहपूर्ण आणि देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या शानदार सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. राजू मामा भोळे तसेच चार्टर्ड अकाउंटंट श्री. आर. डी. जैन सर यांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्वांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. संस्थेच्या अध्यक्ष माननीय सौ. रोजमिन खिमानी प्रधान यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. त्यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीची भावना रुजविण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांतून भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा गौरवशाली इतिहास तसेच देशाच्या उज्ज्वल भविष्याची स्वप्ने प्रभावीपणे मांडली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शाळा परिसर देशभक्तीच्या नाराने दुमदुमून गेला होता.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना मार्गदर्शन केले. “शिक्षण, संस्कार, शिस्त आणि देशप्रेम यांच्या बळावरच विकसित भारताचे स्वप्न साकार होईल,” असा प्रेरणादायी संदेश आमदार राजू मामा भोळे यांनी विद्यार्थ्यांना दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने यंदाचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा अत्यंत स्मरणीय ठरला.







