पंढरपूर (रिपोर्टर प्रकाश इंगोले) | भारतीय संस्कृती आणि सणांचे जतन व्हावे तसेच महिलांना नागपंचमीचा सण आनंदात व उत्साहात साजरा करता यावा, या उद्देशाने समाजसेवक अशोक (पिंटू) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेविका ज्योतीताई शिंदे यांच्या संकल्पनेतून प्रभागातील विविध ठिकाणी महिलांसाठी पारंपरिक झोक्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपंचमी हा महिलांच्या जिव्हाळ्याचा सण मानला जातो. या सणादरम्यान महिलांना एकत्र येऊन पारंपरिक आनंद लुटता यावा, यासाठी प्रभागात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या झोक्यांमुळे परिसरातील महिला वर्गात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. महिलांच्या आनंदासाठी आणि आपल्या सांस्कृतिक परंपरा टिकवून ठेवण्यासाठी राबवलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, नागरिकांकडून याबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
महिलांच्या आनंदात भर घालणारे आणि संस्कृतीचे जतन करणारे असे समाजोपयोगी उपक्रम आगामी काळातही निरंतर सुरू ठेवले जातील, अशी भावना आयोजकांच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.







