महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा निवड समिती अध्यक्षपदी सुरेश खोसे पाटील

महाराष्ट्र राज्य पत्रकार

श्रीगोंद्यात पत्रकारांच्या वतीने उत्साहात सत्कार; विविध स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव

अहिल्यानगर (जिल्हा प्रतिनिधी अण्णासाहेब बनसोडे) | महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या अहिल्यानगर दक्षिण जिल्हा निवड समितीच्या जिल्हाध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार सुरेश खोसे पाटील यांची निवड झाली आहे. या निवडीबद्दल शुक्रवार, दि. १४ ऑगस्ट २०२६ रोजी कुकडी गेस्ट हाऊस येथे स्थानिक पत्रकारांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. या नियुक्तीमुळे अहिल्यानगर दक्षिण जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण असून, पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांच्या विविध प्रश्नांना अधिक प्रभावीपणे वाचा फुटेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी पत्रकार सुनील लोणकर, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अमोल झेंडे, अंकुश शिंदे, पीटर रणशिंग, श्रीरंग साळवे, सचिन शिंदे, राजेंद्र राऊत, अमर घोडके, किशोर मचे, सतीश ओहोळ तसेच युवा कार्यकर्ते रमेश मखरे यांच्या उपस्थितीत सुरेश खोसे पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.

सत्काराला उत्तर देताना नूतन जिल्हाध्यक्ष सुरेश खोसे पाटील म्हणाले की, “पत्रकारिता क्षेत्रात काम करत असताना पत्रकारांच्या अडचणी व समस्या सोडवणे आणि त्यांच्या हक्कासाठी संघर्षाची भूमिका घेणे गरजेचे आहे. प्रदेश संघटक संजय भोकरे आणि प्रदेश सरचिटणीस विश्वास आरोटे यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व पत्रकारांना एकत्रित करून त्यांच्या प्रश्नांना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील पत्रकारांना अनेकदा विविध अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत संघटना भक्कमपणे पाठीशी उभी राहणे, आवश्यक मार्गदर्शन मिळवून देणे आणि प्रशासनाकडे न्याय मागण्यांसाठी पाठपुरावा करणे यासाठी खोसे पाटील यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

या कार्यक्रमास परिसरातील अनेक मान्यवर व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सुरेश खोसे पाटील यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here