लातूर (प्रतिनिधी) : शहरातील पल्लवी प्रभाकर साबळे (२२, रा. खोरीगल्ली, लातूर) हिने लातूर – अंबाजोगाई महामार्गावरील महापूर येथील मांजरा नदीच्या पुलावरून शनिवारी रात्री ७.३० वाजण्याच्या सुमारास वाहत्या पाण्यात उडी मारली. यावेळी ती पाण्यात वाहत गेल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक श्रीराम माचेवाड, सहायक पोलीस निरीक्षक निर्मला क्रांती, अंमलदार बाळासाहेब कन्हेरी, साजीद शेख, नायब तहसीलदार राजेश जाधव यांच्यासह अग्निशामक दलाचे जवान, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, पल्लवी साबळे हिचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत हाती लागला नव्हता. गेल्या दोन दिवसांपासून मांजरा धरण १०० टक्के भरल्याने मांजरा नदीपात्रात धरणाचे दरवाजे उघडून पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मांजरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. याच पाण्यात पल्लवी साबळे हिने शनिवारी रात्री महापूर येथील पुलावरुन उडी मारून आत्महत्या केली. याबाबत रेणापूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.






