पेरणी करताना ट्रॅक्टर उलटून आजोबा, नातवाचा मृत्यू

अहमदनगर (प्रतिनिधी) : पेरणी करीत असताना ट्रॅक्टर उलटून आजोबा अन् नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना पारनेर तालुक्यातील अलभरवाडी (वाडेगव्हाण) शिवारात शुक्रवारी दुपारी घडली. याप्रकरणी ट्रक्टरचालकाला अटक करण्यात आली आहे. तुकाराम भिमाजी तरडे (वय ४८) व शुभम दत्तात्रेय तरडे (वय १३) अशी अपघातात ठार झालेल्या आजोबा व नातवाची नावे आहेत, तर जालिंदर नानाभाऊ गुलदगड (वय ३८, रा. यादववाडी) याला अटक करण्यात आली आहे.

यादववाडी शिवारातील शेतामध्ये ट्रॅक्टरला जोडलेल्या पेरणी यंत्रावर बसून तुकाराम तरडे व शुभम तरडे पेरणी करीत होते. तरल जालिंदर ट्रॅक्टर चालवत होता. पेरणी सुरू असताना जालिंदरने ट्रॅक्टर बांधावर चढवला. बांधावरील भरावामुळे ट्रॅक्टर उलटून तुकाराम तरडे व शुभम त्याखाली चिरडले गेले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

दुर्घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुपे पोलिसांना त्याबाबतची माहिती देण्यात आल्यानंतर पोलीस निरीक्षक डॉ. नितीन गोकावे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी जालिंदर गुलदगड याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here