सोलापूर मनपा आयुक्तांनी आरोग्य विभागातील १२ कर्मचाऱ्यांना केले निलंबित

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी विजयकुमार दिवाणजी) : आरोग्य तसेच मलेरिया विभागातील कर्मचाऱ्यांना महापालिका आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे. मलेरिया विभागातील १२ क्षेत्र कार्यकर्ता म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर गैरवर्तन आणि वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान केल्याचा ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली आहे. तर, मानधनावरील २९ कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करत घरचा रस्ता दाखवला आहे.

सोलापूर शहरात सध्या पावसाळ्याच्या दिवसात डेंग्यू, मलेरिया वगैरे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाच्या वतीने शहरातील विविध भागांमध्ये धुराळणी व फवारणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार मलेरिया विभागाकडील जीवशास्त्रज्ञ व त्यांच्या अधिनस्त सर्व कर्मचाऱ्यांना मोबाईल घेऊन जीओ टॅग करण्याचे आदेश दिले होते. मोबाईल घेण्यासाठी प्रशासनाच्या वतीने ऍडव्हान्सदेखील देण्यात आला होता. नियमित बैठका घेऊन मोबाईल चालू ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.

मलेरिया विभागाकडील एकूण १०९ सेवकांपैकी ५१ सेवकांनी मोबाईल घेतला नाही. या सर्व कर्मचाऱ्यांना नोटिसा दिल्या होत्या. त्यामध्ये १२ क्षेत्र कार्यकर्ता यांनी नोटीस घेतली नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढण्यास साहाय्यभूत ठरणारी असल्याने आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत १२ क्षेत्र कार्यकर्त्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तर, मानधनावरील २९ कर्मचाऱ्यांनी नोटीस स्वीकारली नाही, गैरहजर राहिले, नोटिसीला उत्तर दिले नाही असा ठपका ठेवत कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करत कायमचा घरचा रस्ता दाखवला आहे.

मानधनावर नियुक्त कर्मचाऱ्यांची डेंग्यू, मलेरिया, संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी जबाबदारी दिली होती. जीओ टॅग करून कामांची माहिती ऑनलाइन भरण्याचे आदेश दिले होते. मात्र, मोबाईल घेतले नाहीत, कर्तव्य व जबाबदारीत अत्यंत निष्काळजीपणा केला. वरिष्ठांच्या आदेशाची अवमान्यता केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना मोबाईल घेण्यासाठी ॲडव्हान्स दिला आहे, ती रक्कम त्यांच्या वेतनातून कपात करण्याचे आदेश आयुक्तांनी काढले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here