बुलडाण्यात खासदार सुप्रिया सुळेंच्या स्वागतासाठी उभ्या कार्यकर्त्यांना मालवाहू वाहनाची धडक; तिघे गंभीर

बुलडाणा (प्रतिनिधी) : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बुलडाण्यात घडलेल्या या भीषण घटनेत तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे शेगांवकडे जात असताना शनिवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील नांद्री फाट्यावर सुप्रिया सुळे यांच्या स्वागतासाठी उभे असलेल्या लोकांच्या गर्दीत मालवाहू वाहन घुसले. या घटनेत भाजप पदाधिकारी शांताराम बोधे आणि अशोक हटकर व एक कार्यकर्ता जखमी झाला असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरु असल्याची माहिती आहे.

दरम्यान, विरोधकांनी आमच्यावर टीका करत राहावी, आम्ही जनतेची सेवा करत राहणार, असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी काल बुलडाण्यात विरोधकांवर टीका केली होती. महाविकास आघाडी सरकारचे विरोधक अर्थात भाजपने महिला अत्याचार संदर्भात आघाडी सरकार अपयशी ठरलं असा आरोप केला आहे. त्या आरोपाला उत्तर देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आमचे सरकार दडपशाहीचे नाही. टीका करणे हे विरोधकांचे काम आहे आणि त्यांनी करावे, मात्र आम्ही जनतेची सेवा करणार, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here