जळगावातील शिवकॉलनी एटीएम चोरी गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

जळगाव (निलेश पाटील) – शहरातील शिवकॉलनी स्टॉपवरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये झालेल्या 14 लाख 41 हजार रुपयांच्या चोरीचा उलगडा करण्यात जिल्हापेठ पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी हरियाणातील दोन भावांना अटक केली आहे. या गुन्ह्यात सहभागी असलेला एक आरोपी मात्र, पळून गेला आहे. निसार सखू सैफी (वय 39) व इरफान सखू सैफी (वय 28) (दोघे रा. साफेता, ता.गणपूर, हरियाणा) या दोघांना अटक करण्यात आली असून, ते सख्खे भाऊ आहेत.
पोलिसांनी सांगितलेल्या माहितीनुसार, कुरशीद मदारी सैफी (वय 37, रा. अंघोला हतीम, पलवल, दिल्ली) हा मास्टर माईंड आहे. मात्र, तो पोलिसांच्या जाळ्यात येण्यापूर्वीच पळून गेला आहे. कुरशीद हा निसार व इरफान यांच्या मोठ्या भावाचा शालक आहे. इरफान गावाकडे वेल्डींगचे काम करतो, तर कुरशीद व निसार हे ट्रकचालक आहेत. कुरशीदच्या विरुद्ध एटीएम फोडल्याचे काही गुन्हे यापूर्वीच दाखल आहेत. दरम्यान, लॉकडाऊन काळात हे तिघे ट्रान्सपोर्टच्या एक कंटेनरवर काम करीत होते. साधारणपणे जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ते कंटेनर घेऊन (क्रमांक एमएन 01 एडी 8816) कोलकात्याहून भिवंडीला गेले होते. तेथून दोन दिवसांनी पुन्हा कोलकाता येथे गेले. यानंतर मालकाने पुन्हा तिघांना माल घेऊन मुंबईला पाठवले. मुंबईला जळगावातून जात असताना कुरशीद याने शिव कॉलनीतील महामार्गालगतचे एटीएम फोडण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी त्याने आधीच एक गॅसकटर खरेदी करुन कंटेनरमध्ये ठेवले होते. ठरल्यानुसार 11 जुलैला दुपारी ते मुंबईतून निघाले. रात्री 12 वाजेच्या सुमारास मालेगावजवळ एका ढाब्यावर जेवण करुन जळगावाच्या दिशेने निघाले. मध्यरात्रीनंतर शिवकॉलनी स्टॉपवर पोहोचल्यानंतर त्यांनी काही अंतरावर कंटेनर उभे केले. इरफान व कुरशीद हे दोघे एटीएम केंद्रात गेले. दोघांनी गॅसकटरच्या मदतीने मशीन कापून रोकड काढली. गाडी पुसण्याच्या एका कापडात सर्व रक्कम गुंडाळून ते कोलकात्याच्या दिशेने पळून गेले. दरम्यान, 12 जुलै रोजी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. तोपर्यंत तिघेजण कंटेनरसह महाराष्ट्राच्या बाहेर निघून गेले होते.
दरम्यान, कुरशीद याने जळगावात येण्यापूर्वी हरियाणा राज्यात अशाच प्रकारे काही गुन्हे केले आहेत. तेथील पोलीस त्याच्या मागावर होते. चार दिवसांपूर्वी कुरशीद, निसार व इरफान तिघेजण कंटेनरने हरियाणा-उत्तरप्रदेशच्या सीमेवर होते. यावेळी हरियाणा पोलिसांनी त्यांना गाठले. पोलीस मागावर असल्याचे समजताच मास्टर माईंड असलेला कुरशीद मात्र पळून गेला, तर निसार व इरफान पोलिसांच्या जाळ्यात अडकले. जळगावात एटीएम फोडल्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी हरियाणा पोलिसांशी संपर्क साधला होता. हरियाणात दोघे पकडल्यानंतर जळगावातील चोरीच्या घटनेचा देखील उलगडा झाला. त्यानंतर जळगाव पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here