टी-२० वर्ल्डकपचा अंतिम सामना प्रेक्षकांच्या साक्षीने?

नवी दिल्ली : यूएई व ओमान येथे १७ ऑक्टोबरपासून टी-२० वर्ल्ड कपचा थरार रंगणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यूएईमध्ये कडक नियमांचा अवलंब करण्यात येणार आहे. पण टी-२० वर्ल्ड कप या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या १४ नोव्हेंबर रोजी दुबईत होणारा अंतिम सामन्याला मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती असावी यासाठी बीसीसीआय व अमिरात क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांनी यूएईतील प्रशासनाकडे परवानगी मागितली आहे.

यूएईतील प्रशासनाकडून यासाठी परवानगी मिळाल्यास जेतेपदाचा फैसला जवळपास २५ हजार प्रेक्षकांच्या साक्षीने होणार हे निश्चित. यूएई व ओमान येथे आयोजित करण्यात येणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपचा पहिला उपांत्य फेरीचा सामना १० नोव्हेंबरला होणार आहे. ही लढत अबुधाबी येथे होईल. या स्पर्धेचा दुसरा उपांत्य फेरीचा सामना ११ नोव्हेंबरला दुबई येथे रंगेल. १४ नोव्हेंबरला दुबईत अंतिम लढत होईल. या तिन्ही महत्त्वाच्या लढतींसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला आहे.

बीसीसीआय व ईसीबी या दोन्ही बोर्डांकडून अंतिम सामन्यासाठी प्रेक्षकांच्या उपस्थितीची मागणी करण्यात आलेली आहे. जेतेपदाची लढत बघण्यासाठी २५ हजार क्रिकेटप्रेमी असायला हवेत, असे बीसीसीआयला वाटते. टी-२० वर्ल्ड कपचा अंतिम सामना संस्मरणीय ठरावा यासाठी दोन्ही बोर्डांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here