मुंबई (प्रतिनिधी रक्षा गोराटे) : अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या मुंबई-नाशिक आणि मुंबई-गोवा महामार्गासह खराब झालेल्या राज्यातील सर्व महामार्गांची तातडीने दुरुस्ती करण्याची आवश्यकता असून १५ ऑक्टोबरपूर्वी सर्व महामार्गांवरील खड्डे डांबरमिश्रित खडीने भरण्याचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज दिले.
राज्यातील राष्ट्रीय महामार्गांच्या दुरुस्तीसाठी अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्रातील सुमारे १८ हजार कि.मी. राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची आणि देखभालीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर आहे. चारपदरी आणि त्यावरील राष्ट्रीय महामार्ग हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणांतर्गत आहेत.
राष्ट्रीय महामार्गाचे मुख्य अभियंता आणि अधीक्षक अभियंत्यांनी मुक्काम करून राहून युद्धपातळीवर कामे पूर्ण करण्याच्या सूचना देऊन वर्दळीच्या व जास्त पर्जन्यमान असलेल्या महामार्गांवर पावसाळ्यानंतर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या सूचनाही मनोज सौनिक यांनी दिल्या.






