लाच घेताना पोलिसासह दोन पंटर अँटी करप्शनच्या जाळ्यात

कोल्हापूर (जिल्हा प्रतिनिधी नियाज जमादार) : पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे खोटे सांगून आणि गुन्ह्यात मदत तसेच एफआयआरची प्रत देण्यासाठी ५ हजार रुपयाची लाच घेणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलसह दोन पंटरांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

ही कारवाई मंगळवारी सायंकाळी हातकणंगले तालुक्यातील वडगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबल अशोक कृष्णा जाधव, पंटर चेतन गावडे (रा. कोरेगाव, ता. वाळवा) आणि प्रीतम दीपक ताटे (रा. वडगाव, ता. हातकणंगले) अशी लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत.कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यक्ती वडगाव परिसरात वास्तव्यास आहे. त्यांच्यावर मटका जुगार केस दाखल असल्याचे खोटे सांगून पाच हजार रुपयांची लाच मागितली. तसेच या गुन्ह्यात मदत करण्याबरोबरच दाखल गुन्ह्याची मूळ प्रत घेऊन देतो असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या बोलण्याचा तक्रारदार यांना संशय आल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. पथकाने मंगळवारी सायंकाळी सापळा रचून तक्रारदार यांच्याकडून ५ हजार रुपयाची लाच घेताना पंटर दीपक ताटे याला रंगेहाथ पकडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here