पुण्यात लागले विचित्र होर्डिंग ‘कात्रजचा खून झाला‘, भारती विद्यापीठ पोलिसात गुन्हा

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : प्रसिद्ध कात्रज चौकाजवळ “कात्रजचा खून झाला” असे विचित्र होर्डिंग लावणाऱ्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण केल्याच्या कायद्यानुसार अनोखळी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे पोलीस चौकीपासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अशा प्रकारचा प्रक्षोभक बॅनर लावल्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आले होते. मात्र हा बॅनर नेमका कोणी आणि कधी लावला, ते लिहिण्यामागील कारण काय, हे अजून अस्पष्ट आहे. बॅनरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

या प्रकरणी हनुमंत तुकाराम लोणकर (वय ५२ वर्ष, रा. कोंढवा, पुणे) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. “कात्रजचा खून झाला” असं मोठ्या अक्षरात लिहिलेल्या आणि रक्ताने माखलेला सुरा असलेल्या या विचित्र होर्डिंगवरुन मंगळवारी दिवसभर पुणे शहरात मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली होती. तसेच त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणही पसरले होते.

दरम्यान, कात्रज परिसरात अनधिकृत होर्डिंगचे मोठे जाळे पसरल्याचे दिसत आहे. आकाश चिन्ह विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा सूर स्थानिक रहिवाशांनी लावला आहे. पुणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने हा बॅनर काढला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here