मुंबई (प्रतिनिधी चेतन किर्दत) : नार्कोटिक्स पंट्रोल ब्युरो (एनसीबी) ने वांद्रे आणि जोगेश्वरी येथे कारवाई करून दोघांना अटक केली. कादर शेख आणि इजे जॉन अशी त्या दोघांची नावे आहेत. त्या दोघांकडून कोकेन, हेरॉईन आणि एमडी जप्त केले आहे.
वांद्रे परिसरात एक जण हेरॉईनची तस्करी करत असल्याची माहिती एनसीबीला मिळाली. त्या माहितीनंतर मंगळवारी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या पथकाने वांद्रे येथे सापळा रचून कादरला ताब्यात घेतले. कादरकडून १०२ ग्रॅम हेरॉईन जप्त केले. कादरविरोधात एनसीबीने गुन्हा दाखल केला. तो कोणाकडून हेरॉईन आणत होता त्याचा तपास एनसीबी करत आहे. ही कारवाई ताजी असतानाच आज एनसीबीने जोगेश्वरी न्यू लिंक रोड परिसरात कारवाई करून नायजेरियनला अटक केली.
इजे हा न्यू लिंक रोड परिसरात ड्रग्ज तस्करी करत होता. एनसीबीच्या अधिकाऱ्यांना पाहून इजे हा पळू लागला. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अर्धा किलोमीटर पाठलाग करून इजेच्या मुसक्या आवळल्या. इजेकडून कोकेन आणि एमडी ड्रग्ज जप्त केले. ड्रग्ज तस्करीप्रकरणी इजेविरोधात एनसीबीने गुन्हा दाखल केला.






