किरीट सोमय्यांच्या निषेधार्थ भारतीय जयहिंद पार्टीचा चक्का जाम

ठाणे (उपसंपादक सतीश बनसोडे) : जरंडेश्वर साखर कारखाना आणि पाटबंधारे खात्यातील कथित भ्रष्टाचाराबद्दल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्याच्याच निषेधासाठी गुरुवारी भारतीय जय हिंद पार्टीतर्फे ठाण्यात चक्का जाम आंदोलन करण्यात आले.

यावेळी किरीट सोमय्या यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध नोंदविण्यात आला. दरम्यान, यावेळी तीन आंदोलकांना नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली.भारतीय जयहिंद पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील तीन हात नाका येथील पूर्व द्रुतगती मार्गावर हे आंदोलन झाले. प्रश्न व भ्रष्टाचार बाहेर काढायचे असेल तर गुजरात आणि दिल्ली येथे जाऊन भाजप नेत्यांचे काढा, असे आवाहन भासले यांनी केले.

उपमुख्यमंत्री पवार यांना कथित सिंचन घोटाळयामध्ये आधीच क्लीनचिट दिली आहे. तरीही केवळ सूडबुद्धीने भाजप नेत्यांकडून त्यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचा आरोप त्यांनी केला. भारतीय जयहिंद पार्टीचे पूर्ण समर्थन पवार यांना असल्याचे सूतोवाचही यावेळी भोसले यांनी केले. भाजप पक्षात सगळेच आलबेल नसून त्यांच्या नेत्यांचे देखील मोठमोठे घोटाळे आहेत. ते किरीट सोमय्या यांच्या घरात घुसून आपण लवकरच बाहेर आणू, असा इशाराही भोसले यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here