अलिबाग (प्रतिनिधी राजेश बाष्टे) : खेड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ऐतिहासिक गरम पाण्याच्या कुंडांच्या देखभालीकडे नगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे खेडचे ऐतिहासिक वैभव असलेल्या गरम पाण्याच्या कुंडांची दूरवस्था झाली आहे. एकेकाळी ही गरम पाण्याची कुंडे पाहण्यासाठी येथे पर्यटक आवर्जून येत असत. मात्र, नगरपालिका प्रशासनाचे या कुंडांच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्याने या ठिकाणी आता पर्यटक फिरकत नाहीत.
खेड नगरपालिका कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या संरक्षित हरितपट्टा क्षेत्रात प्राचीन, गरम पाण्याचे कुंड आहे. या कुंडातील पाणी कायमस्वरूपी गरम असल्याने या पाण्याला पुरातन काळापासून महत्व प्राप्त झाले आहे. या कुंडातील पाण्याने स्नान केल्यास त्वचारोग नष्ट होतात असा समज असल्याने पूर्वी या कुंडातील पाण्याने स्नान करण्यास स्थानिक नागरिकांसह पर्यटकही येत असत. मात्र, सध्या हे कुंड दुर्लक्षित असल्याने या कुंडाकडे कोणीही फिरकेनासे झाले आहे. आता हा परिसर मद्यपी आणि अवैध धंदे करणारांचा अड्डा झाला आहे.
काही वर्षांपूर्वी शासकीय निधी खर्च करून या परिसराचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर या ऐतिहासिक ठिकाणाकडे दुर्लक्ष झाल्याने या कुंडाची दूरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षात या पवित्र कुंडाची साधी स्वच्छताही केलेली नसल्याने सद्यस्थितीत या कुंडामध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ जमा झाले आहे. तसेच पाण्यात मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि प्लॅस्टीक कचऱ्याचा खच पडला आहे. या ऐतिहासिक ठिकाणची दुरवस्था बदलण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने पुढाकार घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
खेड शहराला प्राचीन, ऐतिहासिक, पौराणिक, वारसा असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या शहरात पुरातन काळातील अनेक खुणा विविध ठिकाणी आढळून येतात. शहरातील खांबतळे, पुरातन लेणी, बंदर परिसर व तेथील शेकडो वर्ष जुन्या समाध्या, गरम पाण्याचे कुंड, भैरी मंदिर आदी ठिकाणी फेरफटका मारल्यानंतर त्याची साक्ष पटते. परंतू ही सर्वच ठिकाणे दुर्लक्षित व अविकसित आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून शहरातील या ठिकाणांच्या विकासासाठी प्रयत्न सुरु आहेत. स्थळे विकसित करण्यासाठी योजना जाहीर होत आहेत. मात्र हा विकास केवळ कागदावरच असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
खेड शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गरमपाणी कुंड क्षेत्रात प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे. याठिकाणी स्वागत कमान व घाट बांधला आहे. गेल्या २५ वर्षात याठिकाणी सुशोभिकरणाच्या कामासाठी लाखो रुपये खर्च झाले आहेत. मात्र, प्रवेशद्वारावर उभारण्यात आलेल्या स्वागत कमानीला सध्या वेली, झाडाझुडपांनी वेढले आहे. पादचारी मार्गाच्या दुतार्फाही आठ ते दहा फुट उंच वाढलेली गर्द झाडी, कुंडाच्या परिसरात एक ते दोन फुट वाढलेले गवत, कचऱ्याचा खच, साचला आहे.






