कॉपीराईटच्या नावाखाली खंडणी उकळणाऱ्या दोन कंपन्यांविरूद्ध पुण्यात गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी सुनिल भोसले) : शहरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित लग्न सोहळ्यात वाजविण्यात येणाऱ्या गाण्यांसाठी कॉपीराईट परवान्याच्या नावाखाली दोन कंपन्यांकडून खंडणी उकळली जात असल्याचे उघडकीस आले आहे. नागरिकांना कॉपीराईटचा परवाना न घेतल्यास लग्न सोहळा बंद पाडण्याची धमकी कंपन्यांकडून दिली जात होती. याप्रकरणी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी लक्ष घालून कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यानुसार कोरेगाव पार्क पोलिसांनी फोनग्राफी परफॉर्मन्स लिमिटेड (पीपीएल) आणि नोव्हेक्स कम्युनिकेश प्रायव्हेट लि. कंपनीच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

कोरेगाव पार्क परिसरातील पचतारांकित हॉटेलमध्ये उच्चभ्रुच्या मुला-मुलीचे लग्न सोहळे आयोजित केले जातात. कॉपीराईट अ‍ॅक्ट १९५७ चे कलम ५२ (१) (झेडए) नुसार संबंधित कार्यक्रमांना कॉपीराईट अ‍ॅक्टमध्ये सूट देण्यात आलेली आहे. मात्र, तरीही नोवेक्स कम्युनिकेशन लिमिटेड व फोनोग्रफिक परफॉर्मन्स लिमिटेड कंपन्यांचे संचालक, पदाधिकारी, फिल्ड ऑफिसर्स व कंपनीनी संगनमत केले. पंचतारांकित हॉटेलमध्ये होणाऱ्या लग्न व इतर कार्यक्रमांचे वेळी मालक-आयोजकांना कॉपीराईट प्रमाणे लायसन्स घेण्यासाठी सांगितले. लायसन्स न घेतल्यास लग्न सोहळ्यातील कार्यक्रम बंद पाडण्याची भीती घालून संबंधित कंपन्यांचे प्रतिनिधी पैसे उकळत होते.

तक्रारदार यांच्या बहीणीचे ऑगस्ट २०२१ मध्ये कोरेगाव पार्क परिसरातील पंचतारांकित हॉटेलमध्ये लग्न झाले होते. त्यावेळी आरोपींनी लग्न सोहळ्यासाठी कॉपीराईटचे परवाना घेण्यास सांगितला. दोन्ही कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्येकी ४४ हजार ७०० रुपये असे मिळून ८९ हजार ६०० रुपये तक्रारदाराकडून घेतले. त्यांच्या ओळखीतील एका व्यक्तीकडून लग्नासाठी दोन्ही कंपन्यांनी मिळून ४७ हजार ४०० रुपये असे एकूण १ लाख ३७ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन कॉपीराईट अ‍ॅक्टचा परवाना घेण्यास भाग पाडले होते. लायसन्सवर कंपनीचे पदाधिकाऱ्यांनी लग्न सोहळा किंवा लग्न सोहळ्याशी संबंधित कार्यक्रमाच्या नावांचा उल्लेख न करता डीजे पार्टी गेट-टुगेदर बर्थडे पार्टी असे हेतूपुरस्पर खोटे नमूद करून तक्रारदार यांची दिशाभूल केली. त्यानुसार दोन्ही कंपन्यांविरूद्ध खंडणी स्वरुपात पैसे घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here