कराड तालुक्यातील शेतकऱ्यांची सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी
नाशिक (विशेष प्रतिनिधी इंजि कुबेर जाधव) : २ ऑक्टोबर राज्यातील सहकारी शेती उत्पन्न बाजार समित्या व खरेदी विक्री संघ या संस्था शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांच्यासाठी स्थापन केलेल्या संस्था आहेत, मात्र आज सर्वत्र या संस्थांवर व्यापाऱ्यांनी कब्जा केला असून अडते, दलाल यांची मनमानी सुरू आहे परिणामी गेल्या १५ दिवसापासून काढणी सुरू असलेल्या सोयाबीन चे १०/११ हजार रु प्रतिक्विंटल दर व्यापाऱ्यांनी संगनमताने पाडले असून आज सोयाबीन ५/६ हजार रु क्विंटल असे भाव घसरले आहेत,तरी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांची लूट थांबवण्यासाठी बाजार समित्या व सहकारी खरेदी विक्री संघ यांनी स्वतःची भांडवल गुंतवणूक करून सोयाबीन योग्य भावाने खरेदी करून नंतर विकावे व खाजगी व्यापाऱ्यांच्या मनमानीला आणि अन्यायाला पायबंद घालावा अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी सहकार मंत्री यांचेकडे केली आहे.
निवेदनात पुढे म्हटले आहे की अगोदरच अस्मानी संकटाने शेतकऱ्यांना तडाखा दिला आहे,राज्यात अतिवृष्टीने खरीप पिके व महापुराने ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे, अशातच सोयाबीन हे अडचणीच्या वेळेला चार पैसे मिळवून देणारे कमी कालावधीचे पीक म्हणून राज्यातील शेतकरी अलीकडे मोठ्या प्रमाणावर याची लागवड करतात सध्या या पिकाची काढणी सुरू असून, सोयाबीन मोठया प्रमाणावर मार्केटमध्ये येत आहे मात्र दुर्दैवाने भाव निच्चांकी पातळीवर पाडण्यात आले असून,सणवार तोंडावर असल्याने शेतकरी नाईलाजाने मिळेल त्या भावाने सोयाबीन या व्यापाऱ्यांना विकत आहेत, वरून वजन तूट,काटा मारी करून शेतकऱ्यांना लुटले जात आहे,बाजार समिती, खरेदी विक्री संघ यांच्या आवारातच या संस्थांच्या म्हणजे शेतकरी मालकीच्या जागेतच शेतकरी लुटले जात आहेत,शासकीय गोदामात च खाजगी व्यापारी आपला माल ठेवून सहकारी संस्थांचा गैरवापर करत आहेत.
दुसरीकडे या संस्थांनी शेतमाल हमीभावाचे फलक निव्वळ शो म्हणून लावले असल्याचे संतापजनक चित्र आहे,कुठेही हमीभाव केंद्र अस्तित्वात नसून सर्व खरेदी विक्री खाजगी व्यापाऱ्यांच्या ताब्यात आहे,सोयाबीन पासून निर्माण होणारे खाद्यतेल, पेंड,जनावरांचे खाद्य व इतर उत्पादन यांचे भाव गगनाला भिडले असताना शेतकऱ्यांच्या सोयाबीन चे भाव मात्र नेहमीच कोसळत आहेत, आणि शेतकरी आर्थिक दृष्ट्या प्रचंड नुकसानीत येत आहे,तरी बाजार समित्या, सहकारी खरेदी विक्री संघ,शेतकरी सहकारी संघ याना आदेश देऊन सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करून योग्य भावात सोयाबीन व इतर माल खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे शेतकऱ्यांनी केली आहे.
यावेळी शिवाजी पाटील, विश्वजित थोरात,रवींद्र यादव दत्तात्रय थोरात,दादासो पाटील, पंढरीनाथ माने,सचिन महाडिक, अनिल साळुंखे व शेतकरी उपस्थित होते. निवेदनाची प्रत उपनिबंधक सो सहकारी संस्था कराड यांना देण्यात आली आहे,






