काबुल (अफगाणिस्तान) : तालिबानने ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानवर ताबा मिळवल्यापासून देशातील परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. याचदरम्यान आज राजधानी काबूलमधील एका मशिदीबाहेर झालेल्या स्फोटात अनेक नागरिक ठार झाले आहेत. दरम्यान, काबूलमधील ईदगाह मशिदीच्या प्रवेशद्वाराजवळ हा स्पष्ट झाला, असे तालिबानचे प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहीद यांनी ट्विटरवर सांगितले.
प्रवक्ते झबिहुल्ला मुजाहीद यांच्या आईचा गेल्या आठवडय़ात मृत्यू झाला होता. त्यांच्या आईसाठी रविवारी दुपारी मशिदीत प्रार्थना सोहळा आयोजित करण्यात आला होता. मुजाहीद यांनी शनिवारी सोशल मीडियावर पोस्ट करत या प्रार्थना सोहळय़ाला उपस्थित राहण्याची मित्रांना आणि नागरिकांना विनंती केली होती. ‘मी ईदगाह मशिदीजवळ स्फोटाचा आवाज ऐकला आणि त्यानंतर गोळीबार झाला,’ अशी माहिती मशिदीजवळचा दुकानदार अहमदउल्ला यांनी एएफपी वृत्तसंस्थेला दिली.
स्फोटाच्या काही वेळापूर्वी तालिबानने ईदगाह मशिदीत झबिहुल्ला मुजाहीदच्या आईसाठी प्रार्थना समारंभ आयोजित करण्यासाठी रस्ता अडवला होता, अशी माहिती समोर आली आहे. राजधानीतील दोन ठिकाणी एएफपीच्या पत्रकारांनीही स्पह्ट आणि गोळीबाराचा आवाज ऐकला तसेच जखमींना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका काबूलच्या रुग्णालयाच्या दिशेने धावताना दिसल्या.






