श्रीनगर (ऑल इंडिया उपसंपादक राजन चौधरी) : उत्तर कश्मीरच्या बारामुल्ला जिह्याच्या उरी प्रांतातील एलओसीजवळ लष्कराने रविवारी तब्बल २५ कोटींचे ड्रग्ज जप्त केले. लष्कराची सतर्कता लक्षात येताच तस्करांनी साधारण २५ ते ३० किलो इतक्या ड्रग्जच्या बॅगा फेकून देत पळ काढला.
या ड्रग्ज तस्करीमागे पाकिस्तानचा हात असल्याचे उघड झाले आहे. भारतात या ड्रग्जची तस्करी करण्याचा पाकिस्तानचा कट होता. पाकिस्तानने दहशतवादी कारवाया घडवून आण्ण्यासाठी नशेखोरीचा मार्ग पत्करल्याचेही यातून उघड झाले आहे.
लष्कराच्या जवानांना एलओसीजवळ संशयास्पद हालचाली दिसल्या. त्यानंतर परिसरात सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आले. यावेळी जवानांना जवळपास २५ ते ३० किलो वजनाचे हेरॉईन सापडले. हा अंमली पदार्थांचा साठा पाकिस्तानातून आणण्यात आल्याचे बॅगवरील मजकुरावरून स्पष्ट झाले आहे. लष्कराने ड्रग्जच्या बॅगा जप्त करून पोलिसांच्या ताब्यात दिल्या आहेत.






