रेषांना बोलते केले चित्रकार निकेतन भालेराव यांनी सोहमच्या मंचावर

मुंबई  (संपादक सुनिल पाटील) :  ‘कला’ मग ती कुठलीही असो, कलाकाराचे प्रतिबिंब त्यात डोकावते .हस्तकला, चित्रकला, गायनकला ,वादनकला या कलाच अशा समृद्ध आहेत की त्या कलाकाराकडे बघून आपल्याला त्याची अनुभूती येते. डॉ.मीनलजी भोळे संचलित सोहम कला गुणगौरव अकादमी, मुंबई आयोजित चित्रकार व्यावसायिक संधी (पोट्रेट ,निसर्गचित्र, अमूर्त चित्र )या वेबिनार मध्ये मान. श्री. निकेतन भालेराव यांनी चित्रकलेचे कलाविश्व उलगडले.
चित्रकलेची सुरुवात कशी झाली?या क्षेत्रातले गुरु कोण? कोण कोणत्या चित्रपटात सहाय्यक कलादिग्दर्शक म्हणून काम केले ?विद्यार्थ्यांना चित्रकार व्हायचे असेल तर काय तयारी करायला हवी ?या आणि अशा प्रश्नांच्या माध्यमातून चित्रकला हे करियर कशा प्रकारे होऊ शकते याची उद्बोधक माहिती निकेतन सरांनी दिली.सरांचे अनुभवविश्व इतके समृद्ध होते की त्यांना त्यांच्या चित्रकलेवर किती बोलू किती नको असे झाले होते.

कलाकाराची पहिली ओळख त्याच्या कलाकृतीतून होण्यासारखा दुसरा आनंद नसतो. व्यक्तीची थेट ओळख होण्यापूर्वी तिच्या अदाकारीचा परिचय झाला, तर त्या व्यक्तिमत्त्वाचे सगळे कंगोरे हळूहळू लक्षात येऊ लागतात. ती व्यक्ती जर चित्रकार असेल तर त्याच्या रेषा आणि रंग आधी बोलतात आणि मग ती व्यक्ती आपल्या मन:चक्षूंसमोर आकार घेऊ लागते. रंगविलेल्या आकारांतून साधलेली कलाकृती म्हणजे चित्र, अशी चित्राची सर्वसामान्य व्याख्या करता येते.
मुळातच सोहम अकादमीने नावीन्याचा ध्यास घेत विविध कार्यक्रम घेतले आहेत .’चित्रकला व करियर’ असा वेगळा विषय घेऊन त्यावर वेबिनार आयोजित करून डॉ.मीनल मॅडमने विद्यार्थ्यांना एक वेगळाच अनुभव दिला.ज्या प्रतिभावंत चित्रकारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले,त्या श्री. वासुदेव कामत,श्री.गाढवे,श्री.जोशीया गुरूंचा उल्लेख करायला विसरले नाहीत.

या कार्यक्रमाचे सुंदर सूत्रसंचालन श्रीम .समीक्षा तावडे यांनी केले असून त्यांना श्रीम.प्रीती उरणकर, श्रीम.प्रिया उपासनी यांचे सहकार्य लाभले ,तर तंत्रस्नेही गायत्री मॅडमचे विशेष योगदान लाभले. विद्यार्थ्यांना चित्रकलेकडे बघण्याचा एक नवीन दृष्टीकोन दिल्याबद्दल सर्वांनी सोहम परिवाराचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता झाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here